Educational materials from Gorevadi school | गुरेवाडी शाळेत टाकाऊपासून शैक्षणिक साहित्यनिर्मिती
गुरेवाडी शाळेत टाकाऊपासून शैक्षणिक साहित्यनिर्मिती

सिन्नर : शालेय जीवनात बौद्धिक विषयांच्या अध्यापनाकडे शिक्षकांचा कल अधिक असतो. तुलनेने कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण हे विषय दुर्लक्षित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास खीळ बसते. सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ निर्माण करून देणे शिक्षकांचे आद्यकर्तव्य आहे. हीच बाब हेरून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गुरेवाडी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी वार्षिक परीक्षा संपताच छंदवर्गाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले.
      गुरेवाडी शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नैसर्गिक खेळांचा आनंद ही मुले घेत असली तरी त्यांना प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे खेळांच्या साहित्याची वानवा असते. मुख्याध्यापक पद्मा एन्गुंदल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आशा चिने यांनी पदरमोड करीत बॅट, बॉल, स्टंप आदी क्रि केटच्या साहित्यासोबत इतर खेळांचे साहित्य विकत घेत विद्यार्थ्यांच्या छंदाला प्रोत्साहन दिले. क्रिकेटच्या एका संघात असलेले खेळाडू, पंच, गोलंदाज, फलंदाज, यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षक यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगत विद्यार्थ्यांसोबत खेळाचा आनंद लुटला. त्याचप्रमाणे छंदवर्गात टाकाऊपासून शैक्षणिक साहित्यनिर्मिती, परिसरातून उपलब्ध होणारे रंगीबेरंगी खडे, काड्या, चिंचोके, विविध झाडांच्या बियांंपासून सुंदर कलाकृती विद्यार्थ्यांकडून बनवून घेण्यात आल्या. मातीपासून विविध वस्तू, फळे, मूर्ती तयार करण्यात आल्या. शाळेत पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय करत भूतदयेची शिकवण कृतीतून देण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीत झाडे जिवंत ठेवण्यासाठी खोडाला दगडगोटे, पालापाचोळ्याचे आच्छादन तयार करण्याचे साधे मात्र परिणामकारक तंत्रही विकसित करण्यात आले आहे. बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकास तितकाच महत्त्वाचा आहे. शारीरिक क्षमतेबरोबर व्यक्तीतील इतर महत्त्वाच्या गुणांचा विकास खेळामुळे घडतो. बहुतेक लोक खेळाकडे मनोरंजन व शारीरिक व्यायाम या दृष्टिकोनातून पाहतात. खेळामुळे मानवातील इतर सुप्तगुणही विकसित होत असल्याने व्यक्तिमत्त्व विकासात शारीरिक क्षमता वाढविताना खेळाला महत्त्व दिले पाहिजे. खेळामुळे खिलाडूपणा, सांघिकवृत्ती, सहकार्याची भावना, नेतृत्वगुण, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास वाढीस लागतो. स्पर्धा करण्याची ईर्षाही निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे आशा चिने यांनी यावेळी सांगितले.

दुसरे बातमी वृत्त....by घोटेकर सर दिव्य मराठी...