जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी, ता.सिन्नर, जि.नाशिक, आपले सहर्ष स्वागत करत आहे.


प्रभातफेरी, ध्वजारोहण व बालाविष्कार संक्षिप्त

उपक्रमांची पार्श्वभूमी

काही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मला मिळाली. मला सांगण्यात आलं होतं की, ह्या मुलांना घरी घ्यायला जावं लागतं, आपण कितीही सांगितलं तरी ते शाळेत येत नाहीत(वेळेवर येणं तर लांबच) मधल्या सुट्टीत गायब, परिपाठ काही माहित नाही, मुलं खूप हुशार आहेत- तर कोणालाच कसं वाचता येत नाही? काही मुलं येतात स्वच्छ( म्हणजे आंघोळ नाही हं! यापूर्वी कधी केली माहीत नाही),..आंघोळ केली असं सहज खोटं बोलणं( सहपरिवार), टॉयलेटला पाणी कशाला? गैरहजेरी??? अहो, आले तर अभ्यास! प्रगत म्हणजे काय हो! किती हा प्रश्नांचा गोतावळा?
मी माझ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सूचना दिल्या. त्यांना काय आवडतं? याचा जरा अभ्यास केला. त्यांच्यात मिसळले ,जे त्यांना जरा अप्रुप वाटत होतं. सुरुवातीचे पंधरा दिवस जुना कार्यक्रमच चालला पण थोड्या सुधारणा दिसत होत्या, ज्या मला अपेक्षित होत्या.
माझं नियोजन :
१) परिस्थितीशी एकरूप होणं : मूल्यवर्धक संस्कारक्षम गोष्टी मोबाईलवर कधी तोंडी सांगितल्या. कृतीयुक्त बालगीते परिपाठातही व कंटाळा आल्यावर सुद्धा जास्तीत जास्त घेतले कारण या मुलांना नाचायला खूप आवडते - विशेषतः त्या वेळेत ज्या वेळेत विद्यार्थी दुपारी घरीच थांबायची. चांगलं वागणारे, स्वच्छ (म्हणजे आंघोळ केलेले) विद्यार्थ्यांचे परिपाठात कौतुक, चॉकलेट, बिस्किटे बक्षीस देऊन व टाळ्या वाजवून जरा जास्तच (खोटं सुद्धा) कौतुक केलं. त्यांना हा विश्वास दिला की सर्वच खूप सुंदर दिसतात त्यासाठी दररोज आंघोळ करावी लागेल. त्यांना "सुंदर" म्हटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंद पाहण्यासारखा होता. आता प्रत्येकाला पहिल्या भेटीत " आंघोळ केली का ? " हा प्रश्न विचारतेच. त्यासाठी त्यांचं प्रबोधन करते.
२) जेवताना श्लोक: जेवताना हात न धुणे, जेवताना श्लोक? श्लोक कशाला म्हणतात हे कदाचित माहीतच नसावं. त्यामुळे विद्यार्थी मला हसत होते.आणि पालक गंमत बघत होते. कदाचित हे त्यांच्या पचनी पडणे कठीण जात होते. हात धुतल्याशिवाय व श्लोक म्हटल्या शिवाय जेवायचे नाही असा नियमच केल्याने विद्यार्थी मंडळी हात धुतले की दाखवू लागली. व श्लोक माझ्या मागे म्हणायचा - व्यवस्थित म्हटला तर ठीक नाहीतर व्यवस्थित येई पर्यंत पुन्हा म्हणा ! यामुळे श्लोक लवकरच पाठ झाला व आता खूप थोड्या मदतीची गरज असते.
मी विद्यार्थ्यांचे पूर्ण जेवण होईपर्यंत तिथेच थांबायचे , त्यामुळे जेवताना खोड्या काढणे आणखी काही गोष्टी होणं बंद झालं. जेवताना चप्पल घालणे, सहज शिव्या देणे, या बाबी समजावून प्रमाण कमी झालं. जेवणापूर्वी नित्याने हात धुणे व आता विद्यार्थी "डेटॉल साबण कुठंय म्याडम? हात धोयचेय !" असं विचारतात. नाहीतर रांगेत बसल्यावर एखादं दुसरं कोणी हात धुवायचे बाकी राहिलं की लगेच रिपोर्टिंग. शिक्षकांशी मात्र फार कमी बोलणं (कारण शिक्षकांविषयी आदर- शिक्षकांना महान समजणं) हीच बाब परिवर्तन होण्यासाठी माझ्या कामी आली.
३) परिपाठ -एकच एक प्रार्थना 'अजाण आम्ही तुझी लेकरे' तीही कितीच वेळा मधेच संपायची. मी सहा वारांच्या सहा वेगवेगळ्या प्रार्थना घेऊ लागले. विद्यार्थ्यांना प्रार्थना म्हणणे कठीण जात होते. उच्चार जमत नव्हते.तरीही दररोज माझ्या मागे प्रार्थना म्हणण्याचा माझा आग्रह असायचा. संविधान तर कठीणच गोष्ट ! संविधान ही असेच घेतले. आता विद्यार्थी स्वतः म्हणतात. श्लोक, जप, मूल्यवर्धक गोष्ट माझ्यामागे म्हणणे, यामुळे बऱ्याच सुधारणा मला आढळल्या.
४) वर्गातलं जाळं काढणं, मैदान खराट्यानं झाडणं, दोन तीन गोण्या भरतील एवढा गुटखा व तत्सम रॅपर शाळेच्या पहिल्या दिवशी कचऱ्यात जमा करून जाळणं, व्हरांड्यातील गुटख्याच्या पिचकाऱ्या पावडर टाकून धुणे, खड्डे खोदणे, हे सर्व होताना गाव गंमत पाहत होता.
५) गृहभेटी : आता ९०% उपस्थिती असते. हो पण यासाठी दररोज एखादा अपवाद दिवस वगळता प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्यांना शाळेत आणावे लागते. रजेवर होते तेव्हा विद्यार्थ्यांनी माझ्याबद्दल विचारले की, "आमची म्याडम का नाही आली?" म्हणजे विद्यार्थ्यांनी मला स्विकारलं तेही मनापासून!
६) स्वच्छता : वैयक्तिक व परिसर स्वच्छता. सर्वांची नखे कापून देते. वारंवार याविषयी चर्चा , आवश्यक उपाययोजना व प्रलोभन यामुळे खूप सकारात्मक बदल जाणवला.
खरंच ही मुलं खूप हुशार आहेत, शिकविलेलं चटकन समजतं, पण त्यांच्या पाट्या कोऱ्याच असल्यानं माझं ध्येय स्वच्छता, हजेरी व किमान अध्ययन पातळी एवढंच आहे .
पण मी म्हणेन की मी गड गाठला! स्वच्छता अन् उपस्थितीचा लागलीच अभ्यासाचाही!
स्वानुभव, आशा चिने

No comments:

Post a Comment